महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमधून मराठी माणसांचा टक्का सातत्याने कमी होत चालला आहेत. त्याबाबत चिंताही व्यक्त करण्यात येते. दरम्यान, आझाद मैदानामध्ये झालेल्या दसरा मेळाव्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंईबाहेर गेलेल्या मुंबईकरांबाबत मोठी घोषणा केली आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार, असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
दसरा मेळाव्यामध्ये याबाबतची घोषणा करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकारने गिरणी कामगारांना घरं दिली. तसेच उरलेल्या सर्व गिरणी कामगारांनाही घरं हे महायुती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या गिरणी कामगारांच्या कष्टाच्या घामावरच ही मुंबई उभी राहिली आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. अनेक प्रकल्प २०-२५ वर्षे रखडले. मुंबईत राहणारा माणूस मुंबईबाहेर गेला. काही लोक मरून गेले. म्हणून आम्ही रमाबाई आंबेडकरनगर एसआरए आणि एमएमआरडीएला दिलंय. १७ हजार घरांचा हा प्रकल्प आहे. त्या दिवशी मी चेक वाटले. अक्षरश त्या लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. २० वर्षे त्यांना काही मिळालं नव्हतं. मुंबईतील काही प्रकल्प विकासकांनी रखवडले आहेत. लोकांना भाडं मिळत नाहीये. काही लोकांना मुंबईबाहेर जावं लागलंय. हे सर्व प्रकल्प सरकार टेकओव्हर करणार. तसेच हे प्रकल्प आम्ही पूर्ण करणार. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणणार. हेदेखील हे सरकार करणार आहे. कायदा बदलू, नियम बदलू, जे काही आवश्यक असेल ते बदलू पण मुंबईकरांना न्याय देण्याचं काम करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.