मुंबई : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यांच्याच नेतृत्वात शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा होईल, असे विधान केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी केल्यामुळे यासंदर्भात गेले काही दिवस सुरू असलेला वाद चिघळण्याची चिन्हं आहेत.राणे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, केवळ बाळासाहेबांचे वारस म्हणून शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकत नाही. त्यासाठी विचार लागतो. आता उद्धव ठाकरे कोणता विचार देणार आहेत? ते तर पक्ष सांभाळू शकले नाहीत, ते आता काय बोलतील? शिवाजी पार्कवरील मेळावा शिंदे यांचाच असेल. एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका, ते एकदिवस सगळे काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यांना डिवचू नका, असा इशाराही राणे यांनी दिला.
महापालिकेकडून अद्याप परवानगी नाहीच - शिवाजी पार्कवर परंपरेनुसार मेळावा आयोजित करण्याबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून महापालिकेला लेखी परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने त्यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यातच शिंदे गटाने मेळावा घेण्याची तयारी चालविली असल्याच्या बातम्या आहेत. शिंदे हे शिवाजी पार्कवरच मेळावा घेणार की समांतर मेळावा मुंबई वा त्यांचे होमपीच असलेल्या ठाण्यात घेणार, याबाबतची भूमिका शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.- सध्या बरेचसे कर्मचारी गणेशोत्सवाकरिता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.