Join us

शिवसेनेच्या 'त्या' नेत्यावर एकनाथ शिंदेंचा आक्षेप; ३५ आमदार ठाकरेंच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 5:30 PM

शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय वादळ उठलं आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर सेनेच्या गोटात खळबळ उडाली. शिंदे यांच्यासह किती आमदार आहेत याचा आकडा अजून स्पष्ट झाला नाही. परंतु उद्धव ठाकरेंकडे ३५ आमदारांनी संपर्क साधला आहे. २० आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. त्यातील एक जण सुरत मधून बाहेर पडला. मात्र त्याचा कोणाशीही संपर्क होत नाही असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. 

इतकेच नाही तर चार आमदार हॉटेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना पोलिसांनी बाहेर जाऊ दिले नाही. संध्याकाळपर्यंत आणखी काही आमदार बाहेर पडतील. एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांच्याविषयी टोकाचे आक्षेप घेतले आहेत. त्यांचे काही मुद्दे मान्य केले जातील, अशी माहिती शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

बंडखोरांवर कारवाई होणारएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दुही माजल्यासारखं झाले आहे. यात संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, भाजपा कुठल्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते हे दिसते. भाजपासोबत सरकार बनवायचं ही अट भाजपाचा डाव आहे. भाजपानं शिवसेनेला अपमानित केले हे शिंदे यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. परंतु पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी आमदार, मंत्र्यांवर कारवाई होऊ शकते असा इशारा संजय राऊत यांनी केला आहे. 

"गद्दारांना माफी नाही, मुंबईत पाऊल कसं ठेवताय बघूच"शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे वर्षावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. विधानभवनात त्यांना यायवच लागेल असं शिवसैनिक म्हणाले त्याचसोबत उद्धवसाहेबांनी आदेश द्यावे या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री राजीनामा देणार?  सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे