Join us  

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याबद्दल CM शिंदेंचा गौप्यस्फोट, दिली वेगळीच माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 2:48 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या झालेल्या राजकारणाबाबत वेगळीच माहिती दिलीय

मुंबई - राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्यामुख्यमंत्री बनल्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी यापूर्वी एक गौप्यस्फोट केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेते आहेत, ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली, असे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. मात्र, उद्वव ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची वेगळीच स्टोरी शिंदेंनी सांगितलीय.  

मुख्यमंत्री एकनात शिंदेंनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या झालेल्या राजकारणाबाबत वेगळीच माहिती दिलीय. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या हाताखाली कसं काम करणार, म्हणून शरद पवारांच्या सांगण्यावरुन मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे स्वत: बसल्याचं यापूर्वी सांगण्यात आलंय. मात्र, एकनाथ शिंदेंनी आता वेगळाच गौप्यस्फोट केलाय.   

''माझी अशी माहिती आहे की, उद्धव ठाकरेंनीच शरद पवार यांच्यकडे काही माणसं पाठवली आणि माझं नाव सूचवा म्हणून सांगितलं. मग, शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सूचवलं,'' असा गौप्यस्फोट विद्यमान मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसेच, या प्रक्रियेत असलेले लोक माझ्याशी बोलले, काही माणंस आज आमच्यासोबत आले आहेत, तर काही माणसं तिकडे आहेत. पण योग्य वेळ येईल तेव्हा मी त्यांची नावेही सांगेन, असेही शिंदेंनी म्हटले. 

शिवसेनेचा उमेदवार कोण असावा आणि नसावा, याचं शरद पवारांना काय?. शिवसेनेत अवघड जबाबदाऱ्या घ्यायलाच मी असतो, पूर, नैसर्गिक आपत्ती आल्या की मीच जायचो. पण, जबाबदाऱ्या झाल्या की काम संपलेलं असतं, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. 

अरविंद सावंतांनी दिला होता पवारांचा संदर्भ

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, अशी विचारणा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करताना केली होती. 

दरम्यान, एकनाथ शिंदे रिक्षावाले होते. त्यामुळे आम्ही तो शब्द वापरतो. हा शब्द शरद पवार यांनी वापरला नाही. शरद पवार असे शब्द वापरत नाहीत. ही शिवसैनिकांची भाषा आहे, असे सांगत अरविंद सावंत यांनी पुन्हा या विधानावरुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या सांगण्यावरुनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते, असे त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशरद पवारमहाविकास आघाडी