दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 05:30 PM2024-04-30T17:30:31+5:302024-04-30T17:33:18+5:30
दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव या महायुतीच्या उमेदवार असतील.
मुंबई
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा महायुतीत नेमकी कुणाला सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा आपल्याकडे राखण्यात यश आलं आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव या महायुतीच्या उमेदवार असतील. त्यामुळे दक्षिण मुंबईत आता शिंदेसेने विरुद्ध ठाकरेसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.
दक्षिण मुंबईसाठी महायुतीत भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा होती. इतकंच नव्हे, तर याजागेवर मनसेला उमेदवारी जेण्याबाबतही चाचपणी झाली होती. त्यासाठी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण मनसेने निवडणूक लढवण्यात उत्सुकता न दाखवल्यानं चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांनीही मोर्चेबांधणी केली होती. मतदार संघात पक्षबांधणीच्या कामालाही ते लागले होते. पण सरतेशेवटी ही जागा राखण्यात शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावर खलबतं सुरू होती अशी माहिती समोर आली होती. मुंबई उत्तर-पश्चिम आणि दक्षिण मुंबईतील उमेदवारीचा तिढा निर्माण झाला होता. अखेर या दोन्ही मतदार संघांमध्ये शिंदेसेनेनं आज उमेदवार जाहीर केले. आज सकाळी मुंबई उत्तर-पश्चिमसाठी आमदार रविंद्र वायकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर आता दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.