मुंबई - बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार शिंदेंसोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अन् महाराष्ट्राती शिवसेनेतून त्यांच्या भूमिकेला पाठिंबा वाढल्याचे दिसून आले. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून अनेक नेते आणि शिवसैनिक शिंदेंना समर्थन देत आहेत. नुकतेच कोकणातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला असून मी त्यांना बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना म्हणजेच शिवसेनेला आज अजून एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत, असे म्हटले. 'रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत होत्या, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम हे आमच्यासोबतच आहेत. आता, मी रामदास कदम यांना बोलतो,' असे म्हणत कदम यांच्या नाराजीवर एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाण्यातील युवा सेनेचे नेते पूर्वेश सरनाईक यांच्यासह शेकडो युवासैनिक आणि युवतीसैनिकांसमेवत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पाठींबा दर्शवला आहे. तर, अनेक लोकप्रतिनीधींनाही आमची भूमिका समजली आहे. त्यामुळे, सर्वच जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात लोकं संपर्कात येत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ठाण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने हा आदित्य ठाकरेंना धक्का मानला जातो.
लोकहिताच्या कामांना स्थगिती नाही
कुठल्याही लोकहिताच्या कामाला आम्ही स्थगिती दिली नसून केवळ घाईघाईत घेतलेल्या निर्णयांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. सरकार अल्पमतात असताना काही निर्णय घाईघाईने घेण्यात आले होते. त्यामुळे, या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
रामदास कदम हे गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचा विधानपरिषद आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आपण अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांची पुढची वाटचाल काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.