Join us  

"दसऱ्याच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदेंचं खास ट्विट, म्हणाले, ही वेळ आहे…’’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 1:17 PM

Eknath Shinde: दसरा मेळाव्यापूर्वी सकाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट करून दसरा मेळाव्यात काय बोलणार याबाबत संकेत दिले आहेत.

मुंबई - शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवले होते. दरम्यान, या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून, यंदाच्या दसऱ्याला शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत होत आहेत. त्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीमध्ये होणार आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्यापूर्वी सकाळी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ट्विट करून दसरा मेळाव्यात काय बोलणार याबाबत संकेत दिले आहेत.

या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघन करण्याची. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी, मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे बीकेसी मैदानावर जमणार आहोत. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, आपापला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. दोन्ही मेळाव्यांना लाखोंच्या संख्येने शिवसैनिक जमण्याची शक्यता आहे. त्यासाठी हजारो वाहने मुंबईत दाखल होत आहेत. शिंदे गटाने आपला मेळावा अधिक यशस्वी करण्यासाठी शेकडो एसटी बसमधून शिवसैनिकांना मुंबईत आणण्याचं नियोजन केलं आहे. तसेच त्यांच्या आहारासाठी बीकेसी मैदानाजवळ विशेष व्यवस्था केली आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदसराशिवसेना