Join us

Shivsena: "मिंधे सरकारने कागदी घोडेच नाचवले, शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 8:24 AM

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने दसऱ्यापूर्वी घेतला.

मुंबई - राज्यातील शेतकरी संकटात असून दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा होता. त्यानुसार, आता रक्कमही जमा होत आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी शेतकरी मंदतीपासून वंचित असल्याने शिवसेनेनं राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांची स्वप्न वाहून गेली, मात्र मिंधे सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसले काय? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. तसेच, पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई अद्याप का मिळाली नाही, असा प्रश्नही शिवसेनेनं मुखपत्रातून उपस्थित केला आहे. 

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने दसऱ्यापूर्वी घेतला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाचे विहित नियम आहेत. मात्र, या नियमात न बसणाऱ्या राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय विशेष बाब म्हणून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा दिला आहे. मात्र, सरकारच्या केवळ घोषणा होत आहेत, यासंदर्भात प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, असा सवाल विचारत शिवसेनेनं शेतकऱ्यांची कैफियतच मांडली आहे.   

आधी मान्सूनला विलंब झाला म्हणून दुबार पेरणीवर खर्च करावा लागला. त्यानंतर ढगफुटीसारखा पाऊस होऊन अनेक वर्षे खपून संगोपन केलेली शेती पुराच्या पाण्याने खरवडून नेली. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला उरलासुरला घासही हिरावून घेतला. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई कुठल्याही परिस्थितीत पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू अशी गर्जना राज्यातील 'मिंधे' सरकारने केली होती. पोळा होऊन दीड महिना झाला तरी अजून कागदी घोडेच नाचवले जात आहेत. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या 'खोके' सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय?

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात नुकसान

यंदाचा पावसाळा राज्यातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. आधी जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेती बरबाद केली. या धक्क्यातून शेतकरी अजून सावरले नसतानाच आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांचा मोठाच घात केला. गेले 10-12 दिवस राज्याच्या सर्वच भागांत पावसाचे धुमशान सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिह्यांमध्ये पावसाने भयंकर धुमाकूळ चालवला आहे. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीतून जी काही थोडीफार पिके वाचली होती ती आता हाता-तेंडाशी आली होती. मात्र, सुगीचा हंगाम सुरू झाला असतानाच राज्यभर सर्वत्रच ढगफुटीसारखा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते झाले. 

शेतकऱ्यांचा सोयाबीन पुरते नष्ट झालंय

राज्यात यंदा सर्वाधिक पेरा झाला तो सोयाबीनचा. मात्र, सोयाबीनचे हेच पीक आता पुरते नष्ट झाले आहे. परतीचा पाऊस एरवी रब्बी हंगामासाठी तसा उपयुक्त ठरत असतो. पण यंदा तो विध्वंसक बनून आला. परतीच्या सरी एक-दोन दिवस कोसळतील आणि पाऊस निरोप घेईल असे वाटत होते, मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कहरच केला. सलग दुसऱ्या आठवडय़ातही सातत्याने पाऊस सुरूच आहे. पुन्हा पावसाचे थैमानही इतके राक्षसी आहे की शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. सततच्या या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शेतात पाऊलही ठेवता येत नाही. डोळ्यासमोर शेतातील पिकांची नासाडी होत असताना मिळेल ते वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पाऊल ठेवले तरी गुडघाभर चिखलात पाय रुतून बसत असल्याने शेतकरी वर्गावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. ही भयंकर स्थिती विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यांत दिसते आहे. शेतात उभ्या असलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचे जे अतोनात नुकसान डोळ्यासमोर दिसते आहे ते शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेशेतकरीपाऊस