सर्जरीमुळे श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे सांगणाऱ्या नेटकऱ्यांना एकता कपूरने झापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 10:36 AM2018-02-26T10:36:25+5:302018-02-26T11:54:47+5:30
आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला.
मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूनंतर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या नेटकऱ्यांना निर्माती एकता कपूरने चांगलेच फटकारले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू सौंर्दयवर्धक शस्त्रक्रियांच्या अतिरेकामुळे झाला, अशी ट्विटस काही जणांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना एकता कपूर यांनी म्हटले की, विकृत विचारांच्या लोकांना मी सांगू इच्छिते की, हदयाची कोणताही व्याधी नसणाऱ्या काही लोकांनाही (1 टक्के) कार्डिअॅक अरेस्ट येऊ शकतो. माझ्या डॉक्टरांशी बोलून मी याबद्दलची खातरजमा केली आहे. हे सर्व विधीलिखीत होते. त्यामुळे श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असे एकताने म्हटले आहे.
मृत्यूच्या आधी अर्धा तासाचा वेळ श्रीदेवीने पती बोनी कपूर यांच्याबरोबर घालवला होता. दुबईतील लग्नसोहळा आवरून बोनी कपूर मुंबईत परतले होते. पण श्रीदेवी यांना सरप्राइज डिनर देण्यासाठी ते पुन्हा दुबईला गेले. पती बोनी कपूर यांच्याबरोबर डिनर डेटवर जाण्यासाठी श्रीदेवी तयार व्हायला बाथरूममध्ये गेल्यावर त्यांना कार्डिअॅक अरेस्टचा झटका आला होता. त्यानंतर श्रीदेवी बाथरूममध्येच पडल्या. जवळपास 15 मिनिटं त्या आतच होत्या. बराच वेळ होऊनही श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने वॉशरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी बेशुद्धावस्थेत होत्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या मित्राला फोन केला. रात्री नऊ वाजता यासंदर्भातील माहिती पोलिसांना समजली.
श्रीदेवी सहकुटुंबासह दुबईमध्ये भाचा मोहीत मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. श्रीदेवी, पती बोनी कपूर व मुलगी खुशी तिघेही दुबईत होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी सिनेमातील शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाला गेली नव्हती. लग्नसोहळ्यानंतर पती व मुलगी मुंबईला परतले पण शॉपिंग व बहिणीबरोबर राहण्यासाठी श्रीदेवी दुबईत थांबल्या होत्या.
Evil ones pls realise one percent ( as fwded as my doc told me) of the population can have an cardiac arrest without any heart condition or any kind of surgery ! It’s destiny not how evil rumour mongers portray!!!
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) February 25, 2018