लहान भावाच्या छळामुळे मोठ्या भावाची आत्महत्या; मालमत्तेवरून वाद, सात महिन्यांनी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 05:58 IST2025-04-07T05:58:43+5:302025-04-07T05:58:59+5:30

परळ येथे घडलेल्या या प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी अखेर सात महिन्यांनी गुन्हा दाखल केला.  

Elder brother commits suicide due to harassment by younger brother | लहान भावाच्या छळामुळे मोठ्या भावाची आत्महत्या; मालमत्तेवरून वाद, सात महिन्यांनी गुन्हा दाखल

लहान भावाच्या छळामुळे मोठ्या भावाची आत्महत्या; मालमत्तेवरून वाद, सात महिन्यांनी गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडिलोपार्जित मालमत्तेतील वाट्यावरून लहान भावाकडून होणारा मानसिक छळ असह्य झाल्यानेच मोठ्या भावाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती. परळ येथे घडलेल्या या प्रकरणात भोईवाडा पोलिसांनी अखेर सात महिन्यांनी गुन्हा दाखल केला.  

मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या उर्मिला शुक्ला (वय ६५) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उर्मिला यांचे पती अशोक हे व्यावसायिक होते. त्यांचा लहान भाऊ रमेश टॅक्सी चालवतो. दोन्ही भावांमध्ये ८० च्या दशकात मालमत्तेवरून वाद सुरू झाला. अशोक कुटुंबासह परळमधील वडिलोपार्जित घरात राहू लागले. हे घर म्हणजे गॅरेज होते. महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन त्यांनी त्याचे रहिवाशी गाळ्यात रूपांतर करून घेतले होते. अशोक यांनी भावाला वडाळा येथे एक पिठाची गिरणी, घर, तसेच परळमध्ये एक घर अशा तीन मालमत्ता खरेदी करून दिल्या होत्या. त्यावेळी रमेशने परळमधील घरावर हक्क सांगणार नाही असे मोठ्या भावाला सांगितले होते. मात्र, त्या घरावरही त्याने हक्क सांगितला आणि त्यात वाटा मागितला. 

न्यायालयात मागितली होती दाद 
अशोक यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अशोक यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता रमेश भावाचा छळ करीत होता. अखेर, त्याला कंटाळून अशोक यांनी गेल्यावर्षी २० ऑगस्ट रोजी वाळवी मारण्याचे द्रव्य घेतले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला. त्यांनी सर्व घटनाक्रम सांगून भावाच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. २५ ऑगस्टला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अखेर, पोलिसांनी तपासाअंती ७ महिन्यांनी रमेश विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

भावाच्या मृत्यूनंतरही लावला तगादा 
अशोक यांच्या मृत्यूनंतरही रमेशने अशोक यांच्या कुटुंबाला त्रास देणे सुरू केले. २१ डिसेंबरला पत्राद्वारे घरावर पुन्हा हक्क सांगितला. पतीच्या निधनानंतरही रमेश त्रास देत असल्याने अशोक यांच्या पत्नीने पोलिसांकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात रमेशविरोधात गुन्हा दाखल केला.  

Web Title: Elder brother commits suicide due to harassment by younger brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.