Join us

लहान मुलाच्या ऑनलाइन शिक्षणासाठी आईने मोबाइल हिसकावल्याने मोठ्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:40 AM

शिवाजीनगरच्या अहिल्याबाई होळकर मार्गावरील तीन मजली घरात खान कुटुंब राहते.

मुंबई : लॉकडाऊनमुळे दोन्ही मुलांचे आॅनलाइन शिक्षण घरातील एकुलत्या एक मोबाइलवर सुरू झाले. मोठ्या मुलाचा आॅनलाइन वर्ग संपल्यानंतर तो मोबाइल गेम खेळू लागला. त्याचवेळी लहान मुलाचा आॅनलाइन वर्ग सुरू होणार असल्याने आईने त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला. याच रागात १२ वर्षांच्या मुलाने गळफास घेत आयुष्य संपविल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना शिवाजीनगरमध्ये सोमवारी घडली.

शिवाजीनगरच्या अहिल्याबाई होळकर मार्गावरील तीन मजली घरात खान कुटुंब राहते. घरात पत्नी आणि दोन मुले ( अनुक्रमे १० आणि १२ वर्षे ) आहेत. मोठा मुलगा सातवीत होता. घरात एकच मोबाइल असल्याने आॅनलाइन शिक्षणासाठी दोघेही याच मोबाइलचा वापर करत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे मोठ्या मुलाचा आॅनलाइन वर्ग सुरू झाला. आॅनलाइन वर्ग संपल्यानंतर तो मोबाइलवर गेम खेळू लागला.

मात्र, थोड्याच वेळात लहान भावाचा आॅनलाइन वर्ग सुरू होणार असल्याने आईने त्याला मोबाइल देण्यास सांगितला. खेळात रमल्याने त्याने आईकडे दुर्लक्ष करत मोबाइल देण्यास नकार दिला. तो नेहमी मोबाइलमध्ये गेम खेळत असल्याने आई रागाने त्याला ओरडली आणि तिने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला. त्या वेळी दुपारी साडेबारा वाजले होते. तो रागाने तिसऱ्या माळ्यावरच्या खोलीत निघून गेला.            

बराच वेळ झाला तरी मुलगा खाली न आल्याने आई त्या खोलीत गेली. त्याला आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

‘संशय नाही, आत्महत्याच’मुलाच्या मृत्यूबाबात संशय नाही. तपासाअंती ती आत्महत्याच असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी सांगितले.

टॅग्स :आत्महत्याशिक्षण