मुंबई : मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले. ५० वर्षांनी जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. महिलेने अंगावर ओतलेल्या केरोसीनमध्ये पाणीच जास्त असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी घटनेची नोंद करत महिलेला सुखरूप बीडला पाठविले आहे.बीड जिल्ह्यातील राधाबाई साळुंखे यांच्या जमिनीचा वाद ५० वर्षांपासून तेथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होता. त्यांनी तो निकाल त्यांच्या बाजूने लावला. पुढे विरोधकांनी न्यायालयात अपील केले. ५० वर्षांनतर निकाल साळुंखे यांच्या विरोधात लागला. मंत्रालयात याबाबत सुनावणी होईल, या आशेने बुधवारी सकाळीच त्यांनी दोन नातेवाइकांसह मंत्रालय गाठले. जवळील बाटलीतून केरोसीन अंगावर टाकत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे तैनात पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेत त्यांची समजूत काढली.संबंधित मंत्र्यांसोबत त्यांची बैठक घेतली. अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर, साळुंखे यांचे समाधान होताच, त्यांची बीडला जाण्याची व्यवस्था करण्यात आली.यापूर्वी गेल्याच आठवड्यात सावकारी जाचाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.यापूर्वीच्या घटना२५ जुलै : सावकारी कर्जाला कंटाळून उस्मानाबादच्या अलका करंडे या महिलेने मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.२३ मार्च : लासलगावच्या गुलाब शिंगारी या शेतकऱ्याने नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा आरोप गुलाब शिंगारी यांनी केला. त्यामुळे न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते.२२ जानेवारी : धुळे येथील धर्मा पाटील या ८४ वर्षीय शेतकºयाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर विष घेऊन आत्महत्या केली.११ जून : अहमदनगरमध्ये राहणाºया २५ वर्षीय अविनाश शेटेया तरुणाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या निकालाबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे निर्णयाकडे डोळे लावून बसलेला अविनाश प्रचंड निराश झाला होता. यासंदर्भात तो वारंवार मंत्रालयाच्या फेºया मारत होता. मात्र काहीच उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.
मंत्रालयाबाहेर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न; ५० वर्षांनी जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 2:28 AM