वयोवृद्ध दाम्पत्याला ३७९ रुपयांसाठी गमवावे लागले ९९ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:54+5:302021-01-08T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वयोवृद्ध दाम्पत्याला मोबाइल रिचार्ज न होता खात्यातून गेलेल्या ३७९ रुपयांसाठी ९९ हजार ५०० रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वयोवृद्ध दाम्पत्याला मोबाइल रिचार्ज न होता खात्यातून गेलेल्या ३७९ रुपयांसाठी ९९ हजार ५०० रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर परिसरात ६५ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. २९ डिसेंबरला त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून ३७९ रुपयांचे रिचार्ज केले. खात्यातून पैसे गेले, पण मोबाइलचा रिचार्ज झाला नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर गुगल पेच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला.
गुगल पेच्या मिळालेल्या क्रमांकावर त्यांनी कॉल करून आपली तक्रार त्यांना सांगितली. सर्व्हर डाउन असल्याचे खात्यातून वजा झालेली रक्कम बँक खात्यात जमा होईल असे समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगून कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दीपक कुमार नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. खात्यातून गेलेले ३७९ रुपये परत खात्यात जमा करत असल्याचे भासवत दीपककुमारने त्यांना गुगल पे ॲप ओपन करण्यास सांगून ॲपवर माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी माहिती भरताच दहा मिनिटांमध्ये खात्यात ३७९ रुपये जमा होतील असे सांगितले. मात्र खात्यात काही रक्कम जमा झाली नाही.
दीपककुमारने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती घेतली. त्यांनी पत्नीच्या फोन पे ॲपची माहिती दिली. यावेळी मात्र खात्यात पैसे येण्याऐवजी खात्यातून ९९ हजार ५६४ रुपये कमी झाल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. त्यानंतर कॉलधारक नॉट रिचेबल झाला.
यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत कॉल करून खात्यातील सर्व व्यवहारात थांबवले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.
............................