दहिसरमध्ये वृद्ध दाम्पत्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:41 AM2018-10-26T05:41:03+5:302018-10-26T05:41:06+5:30
संधीवातावर मोफत उपचार करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेली व्यक्ती ७० वर्षीय वृद्धेचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली.
मुंबई : संधीवातावर मोफत उपचार करण्याच्या बहाण्याने घरात घुसलेली व्यक्ती ७० वर्षीय वृद्धेचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
रमेश हिरालाल शाह (७२) हे पत्नी उषासोबत दहिसर परिसरात राहतात. त्यांच्या पत्नीला संधीवाताचा आजार होता. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराची बेल वाजली तेव्हा एक ४५ वर्षीय व्यक्तीने संधीवातावर मोफत उपचार करत असल्याचे सांगितले. रमेश यांनी पत्नीलाही संधीवाताचा त्रास असल्याचे सांगताच तो औषध दाखविण्याच्या बहाण्याने घरात घुसला. संधीवातावर उपाय म्हणून शुद्ध सोने एक लीटर थंड पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावे व नंतर ते पाणी प्यायचे असे सांगितले. त्यानुसार, त्यांच्या पत्नीने १ लीटर थंड पाणी त्याच्या पुढ्यात ठेवून त्यात सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी ठेवली. पुढे १० मिनिटे बोलण्यात गुंतवून कुणाचा तरी फोन आल्याचे सांगून तो बाहेर पडला. तो परतलाच नाही. दोघेही त्याची वाट बघत बसले. बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो दिसून आला नाही. त्यांनी दागिने भिजत ठेवलेले भांडे पाहिले तेव्हा त्यात दागिने नव्हते.
लुटारूने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील ८० हजार रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.