Join us

वयोवृद्धेला शौचालयात कोंंडून घरातून पावणेपाच लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

दोन वेळा टाळले...मात्र तिसऱ्यादा चोर घरातच शिरलेचमनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरातील दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी आलो ...

दोन वेळा टाळले...मात्र तिसऱ्यादा चोर घरातच शिरलेच

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरातील दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी आलो असल्याचे सांगत, वयोवृद्धेला शौचालयात कोंंडून घरातून पावणेपाच लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना मालाडमध्ये घडली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. मालाड परिसरात राहणारे भरत वल्लभदास मिस्त्री (५८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

मालाड पश्चिमेकडील टिळक चौक येथील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मिस्त्री कुटुंबीय राहतात. ३ तारखेला सकाळी भरत आणि त्यांचा मुलगा कामासाठी घराबाहेर पडले. पत्नीही आजीला पाहण्यासाठी चेंबूरला गेल्या. यावेळी त्यांची ८२ वर्षीय विजयाबेन घरात एकट्याच होत्या. याच दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास तिघे जण घराबाहेर धडकले. विजयाबेन यांनी जाळीतूनच त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी ये भरतभाई का घर है क्या? याबाबत विचारणा केली. विजयाबेन यांनी सतर्कता दाखवत आता घरात कोणी नसल्याचे सांगत त्यांना परत जाण्यास सांगितले.

थोड्या वेळाने हे त्रिकूट पुन्हा तेथे धडकले. त्यांनी घरातील दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. मात्र विजयाबेन यांनी तेव्हाही दरवाजा उघडला नाही. साडेचार वाजता ही मंडळी पुन्हा तेथे धडकली. विजयाबेन यांनी दरवाजा उघडताच तिघेही घरात शिरले. त्यांनी विजयाबेन यांचे हात टेपने बांधून त्यांना शौचालयात कोंडले. आवाज केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील ऐवज चोरी करून त्रिकूट निघून गेले.

तासाभराने त्यांचा मुलगा आणि नातू घरी येताच त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. मुलाचा आवाज ऐकताच विजयाबेन यांनी शौचालयाचा दरवाजा ठोठावला. तेव्हा त्यांची शौचालयातून सुटका झाल्यानंतर त्यांनी वरील घटनाक्रम मुलाला सांगितल्याने त्यांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले.

अद्याप कुणाला अटक नाही

याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी दिली आहे.