मनीषा म्हात्रेमुंबई : फोर्ट येथील फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे वृद्ध हे एकटेपणाचे बळी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पैशाच्या मागे पळताना हायप्रोफाईल सोसायटीतील पिढी जन्मदात्यांना वृद्धावस्थेत एकटे सोडून परदेशी स्थायिक होत आहे. अशात याच एकटेपणाच्या वनवासात असणाºया वृद्ध पालकांपैकी एकाचा दर दोन ते तीन महिन्यांत मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या निरीक्षणातून समोर येत आहे.फोर्ट परिसरात राहणारे फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी चार दिवसांनी घरातून बाहेर काढण्यात आला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या पत्नी आणि मुलाकडे त्यांची भाची सांचा डिकोस्टाने संपर्क साधला. मात्र अंत्यसंस्कारासाठीही वेळ नसल्याचे सांगून मुलाने येण्यास नकार दिला.यापूर्वी ८ आॅगस्टला लोखंडवाला परिसरात घडलेल्या घटनेने तर सर्वानाच सुन्न करून सोडले. ओशिवरा परिसरात आशा साहानी कुटुंबीयांसोबत राहायच्या. २० वर्षांपूर्वी मुलगा रुतुराज अमेरिकेला स्थायिक झाला. त्यानंतर पतीच्या आधारावर त्या एकट्याच जगत होत्या. अशात २०१३ मध्ये पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या एकट्या पडल्या. एप्रिल महिन्यात मुलाने आईसोबत संपर्क साधला. त्यानंतर त्याने साधी खुशाली किंवा विचापूस करण्यासाठी एकदाही संपर्कही साधला नाही. त्यानंतर १६ महिन्यांनी तो घरी परतला. तेव्हा बंद घरातून आईचा सांगाडाच त्याच्या हाती लागला होता. अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे.बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत जन्मदातेच मुलांसाठी अडचण ठरू लागल्याने असे विदारक चित्र यातून पाहावयास मिळते. फक्त पैसा, स्टेटस जपण्याच्या नादात पालकांना एकटे सोडून ही मंडळी परदेशात अथवा स्वतंत्र राहण्याला पसंती देतात. मुंबईत दर दोन ते तीन महिन्यांनी एकट्या राहणाºया एका वृद्ध पालकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले.मुलुंड, माटुंगा, दादर, कुलाबा, अंधेरी, वांद्रे, कफपरेड, वरळी, मलबार हिल, मरिनलाइन्स, पवई, जुहू, खार अशा उच्चभ्रू वसाहतीतच हा प्रकार अधिक होत असल्याची बाब ही त्याहूनही धक्कादायक आहे.एकत्रित कुटुंब पद्धतीत राहणाºया वृद्धांपेक्षा एकटे राहणाºया वृद्धांचा लवकर मृत्यू होत असल्याची माहिती संशोधनातून उघड झाली. त्यामुळे अनेकदा एकटे राहत असलेल्या वृद्धांमध्ये वय आणि एकटेपणामुळे आता आपण काही कामाचे राहिले नाही अशी भावना निर्माण होते आणि त्यामुळे ते खचून जातात. अनेकदा एकटेपणामुळे ते स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर औषध घेत नाहीत. वाढत्या तणावामुळे ते व्यसनाधीनतेकडे वळतात आणि काही अकाली आत्महत्या करतात तर काहींचा नैसर्गिक मृत्यू होतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.अशावेळी काय करावे... एकटे राहत असलेल्या वृद्धांसोबत दिवसातून किमान १५ मिनिटे बोलणे गरजेचे आहे. त्यांचे कोणीतरी ऐकूण घ्यावे असे त्यांना वाटत असते. परदेशी स्थायिक असले तरी फोनवरून तरी किमान त्यांची खुशाली जाणून घ्यायला हवी, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले....आणि पोलीसच झाले मुलेगेल्या अनेक वर्षांपासून वडाळ्यातील उषा सोसायटीत एकाकी राहणाºया ललिता सुब्रमण्यम या ८३ वर्षांच्या वृद्धेचा वाढदिवस माटुंगा पोलीस जानेवारी महिन्यात मोेठ्या थाटामाटात साजरा करतात.मुले परदेशात असल्याने जवळ कोणीच नाही. मधल्या काळात ललिता यांच्या आयुष्यातील ही उणीव माटुंगा पोलिसांनी भरून काढली. माटुंगा पोलीस ललिता यांना ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात. काहीही लागले, गरज भासली किंवा अगदी वेळ जात नाही असे वाटले, तरी ललिता माटुंगा पोलिसांना हक्काने हाक मारतात. पोलीसही त्यांच्या हाकेला धावून जातात.पोलिसांसमोरअशाही अडचणीअडचण होत असलेल्या वृद्धांना, जन्मदात्यांना त्यांच्या आजारपणाला कंटाळून काही जण त्यांना रेल्वेमध्ये बसवून सोडून देतात. ही मंडळी थेट सीएसटी गाठते. अशा जखमी वृद्धांवर पोलिसांकडून उपचारासाठी धडपड केली जाते. मात्र त्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो. सामाजिक संस्थाही त्यांच्या निवाºयासाठी पुढाकार घेत नाहीत. पर्यायी हे वृद्ध पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठाण मांडून असतात.अनेकदा रस्त्यांवर पडून बेवारस मृतदेहाच्या यादीत त्यांचे नाव जाते. अशा वृद्धांवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात, अशी माहिती एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांनी दिली. त्यामुळे त्यांच्यासांठी विशेष सुविधा करणेही गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पाल्यांसाठी प्रशिक्षण केंद्राची गरज...वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या वागणुकीत बदल होत जातो. मुळात वयस्कर म्हणजे त्यांचे बालपणात पदार्पण होते असे म्हणतात. अशावेळी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे. मुळात पाश्चिमात्य देशांप्रमाणे मुंबईतही पालकांसोबत कसे वागायचे याबाबत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची गरजच आहे. याबाबतही आम्हीही प्रयत्न करत आहोत, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.
वृद्ध ठरताहेत एकटेपणाचे बळी, दर दोन महिन्यांनी एका वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:15 AM