Join us  

निवडणूक २७ डिसेंबर रोजी

By admin | Published: December 02, 2015 2:47 AM

विधानपरिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील दोन जागांसाठी २७ डिसेंबरला होणारी निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत पार पडणार आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील दोन जागांसाठी २७ डिसेंबरला होणारी निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत पार पडणार आहे. त्यासाठी बुधवारी २ डिसेंबरपासून नामनिर्देशन भरता येतील, अशी माहिती शहराच्या जिल्हाधिकारी शैला ए यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.विधानपरिषदेतील एकूण आठ जागांपैकी मुंबईतील दोन जागांवर निवडून गेलेल्या आमदार भाई जगताप आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०१६ रोजी संपणार आहे. परिणामी या दोन जागांच्या निवडणुकीची जबाबदारी मुंबई जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. २ डिसेंबरला अधिसूनचा जारी केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना विधानपरिषदेसाठी अर्ज करता येणार आहे.निवडणूक वेळापत्रकाबद्दल माहिती देताना शैला ए म्हणाल्या की, ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन भरता येणार आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही जागांसाठी अर्ज करता येतील. १० डिसेंबरला नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल, तर १२ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २७ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. ३० डिसेंबरला मतमोजणी करून विजेत्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.बॅलेट पेपरद्वारे २३० मतदार करणार मतदान : एकूण २३० मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील २२५ निवडून दिलेले आणि ५ नामनिदेर्शित सदस्यांचा समावेश आहे. मतदारांच्या नावावर आक्षेप घेण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. तरी ८ डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होईल, हे सर्व मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेतील. मुख्य इमारतीत पार पडणार निवडणूक : मुख्य इमारतीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील बैठक खोली क्रमांक दोनमध्ये मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. बॅलेट पेपरद्वारे मतदार यावेळी मतदान करणार असून ‘नोटा’ या पर्यायाचा समावेशही त्यात करण्यात येणार आहे.