लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण, 2014 च्या निवडणुकांचा विचार केल्यास, आयोगाने 5 मार्च रोजी निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 9 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. तर, महाराष्ट्रात
सन 2014 मध्ये 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. तर 16 मे रोजी निवडणुकांचे निकाल लागले होते. त्यावेळी, महाराष्ट्रात तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पहिला टप्पा 10 एप्रिल रोजी घेण्यात आला होता, त्यामध्ये 10 जागांवर निवडणुक झाली. त्यानंतर, दुसरा टप्पा 17 एप्रिल रोजी 19 जागांसाठी पार पडला. तर, तिसरा टप्पाही 19 जागांचाच ठेवण्यात आला होता. 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रात मतदानचा तिसरा टप्पा पार पडला होता. त्यामुळे यंदाही महाराष्ट्रातील लोकसभा जागांची संख्या लक्षात घेता तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. सध्या, सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या अंतिम करण्याचं काम सुरू आहे. मात्र, आघाडी आणि युतीचा फटका स्थानिक पातळीवरील नेृत्वाला बसत आहे. त्यामुळे राजी-नाराजी सुरू असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या मंत्र्यांना सर्वच विकासकामांची उद्धाटने 8 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे आजच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल, असे दिसून येते. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.