विद्यापीठ प्रशासनाकडून निवडणुकांचे बिगुल, विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांसाठी सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:45 PM2022-06-26T15:45:32+5:302022-06-26T15:45:51+5:30
Election for university administration : आता विद्यापीठ प्रशासनात आणि सिनेट सदस्यांमध्ये अधिसभा निवडणुकांच्या चर्चा रंगणार आहे.
मुंबई: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेच्या निवडणुकीसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन अधिसभा १ सप्टेंबरपासून अस्तित्वात येणे अपेक्षित असल्याने मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यापीठ प्रशासनात आणि सिनेट सदस्यांमध्ये अधिसभा निवडणुकांच्या चर्चा रंगणार आहे.
मुंबई विद्यापीठानेनिवडणूक प्रक्रिया सुरू केली असून यासाठी www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘निवडणूक २०२२’ ही स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. याद्वारे मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था यांचे व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य, विभाग प्रमुख, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि नोंदणीकृत पदवीधर यांना वेळोवेळी सूचना देण्यात येतील, असे प्र. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रक्रियेबाबत कोणाला शंका किंवा अडचणी असतील त्यांनी निवडणूक विभागास arelection@election.mu.ac.in या ई-मेलवर कळवावे, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाकडून विविध प्राधिकरणाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्ये नोंदणीकृत पदवीधर निवडणुकांचाही समावेश आहे, मात्र हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी काही सूचना विद्यापीठ कुलसचिव तसेच सल्लागार समिती सदस्यांना केल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासन व नोंदणी करण्यासाठी इच्छुक असलेल्या पदवीधरांना काही अडचणी येणार नाहीत. जास्तीत जास्त नोंदणी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
काय आहेत नोंदणीसाठी सूचना?
पदवीधारकांची नोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करण्यात यावी.
मागील निवडणुकीवेळी जिल्ह्यात (शहर/ग्रामीण) निवडणूक मतदान केंद्र होती. त्या सर्व केंद्रावर जसे मतदान होते, त्याच मतदान केंद्रावर पदवीधर नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करावी. जेणेकरून ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी गैरसोय होणार नाही.
पदवीधर मतदार नोंदणी करता जे मतदार जुने आहेत त्यांच्यासाठी (ब फॉर्म) शुल्क १०/- व नवीन मतदार नोंदणीसाठी (अ/ब फॉर्म) शुल्क २०/- रुपये आकारण्यात यावेत.
निवडणूक कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून निवडणुका वेळेत घेता येतील.
मुंबई विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून यासाठी www.mu.ac.in या संकेतस्थळावर ‘निवडणूक २०२२’ ही स्वतंत्र लिंक दिली.