प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:58 AM2019-10-19T00:58:17+5:302019-10-19T00:59:18+5:30
कुणाला मिळणार किती जागा? : ३६ मतदारसंघांतील आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा बसणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय पक्षांच्या धडाडत असलेल्या प्रचार व प्रसाराच्या तोफा आज म्हणजे शनिवारी थंडावणार आहेत. विधानसभेच्या प्रचारादरम्यान सभा, फेरी, चौकसभा, सोशल मीडिया; अशा प्रत्येक माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असलेल्या महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये रंगलेला ‘धोबी पछाड’ कुस्तीचा सामना २१ आॅक्टोबर रोजी संपणार असला तरी या सामन्याचा निकाल मात्र २४ आॅक्टोबर रोजी लागणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ३६ मतदारसंघ असून, येथे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र निर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि आप या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी म्हणजे अनेक विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस असून, काही ठिकाणच्या लढती या एकतर्फी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेरी काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे मोठ्या प्रमाणावर चौकसभा घेत मतदारांना आकर्षित करण्यात आले आहे. कुठे मोठ्या सभाही झाल्या आहेत. विशेषत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रेसह भांडुप येथे घेतलेल्या सभा गाजल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांनी तर धुरळाच उडाला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या चांदिवली आणि धारावी येथे झालेल्या सभांनी काँग्रेसला आणखी ‘बळ’ मिळाले.
विशेषत: शुक्रवारी बहुतांशी उमेदवारांनी आपला प्रचार व प्रसारावर जोरदार भर दिला. हातात कमीतकमी वेळ असल्याने बहुतांशी उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. दरम्यान, शनिवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जाणार आहे.
आजारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय
च्दिव्यांग मतदार, गर्भवती महिला, आजारी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या साहाय्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून सर्व मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
च्निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे काळजी घेण्यात येत आहे. याअंतर्गत तब्बल ६० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
च्प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मतदान केंद्रे असलेल्या मंडपांमध्ये अग्निसुरक्षा उपकरणे तैनात ठेवण्यात येणार आहेत.
च्लहान मूल असल्याने मतदानाला कसे जाणार अशी अडचण असणाºया महिलांसाठी निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. महिलांना आपल्या लहानग्यांना घेऊन मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघरांची सुविधा आहे.
प्रत्येक व्यक्तीने कोणीही न सांगता स्वत:हून मतदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपला प्रतिनिधी निवडण्याचा हा हक्काचा दिवस असून आपल्या देशासाठी आणि राष्ट्रासाठी मतदान ही महत्त्वाची गोष्ट आहे.
- भारत गणेशपुरे, अभिनेते
अन्नदान, रक्तदान, देहदानाइतकेच मतदानही महत्त्वाचे आहे. लोकशाहीला जीवनदान देण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाही गरजेची असून त्यासाठी नागरिकांनी रांगा लावून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.
- संदीप पाठक, अभिनेते
मतदारांनी सारासार विचार करून मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. स्वत: मतदान केल्यानंतरच कोणत्याही नागरिकाला सोयीसुविधांबद्दल टीकाटिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो. - पुष्कर श्रोत्री, अभिनेता