Join us

निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर; मविआ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 9:15 PM

जयंत पाटील, नाना पटोले आणि संजय राऊत यांनी एक पत्रक काढत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यात महाविकास आघाडीकडून सत्ताधारी महायुतीला टक्कर देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक पत्रक काढत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. "लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हानिहाय संयुक्त बैठक तातडीने घेणे आवश्यक आहे. यासाठी, महाविकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांनी त्वरित आपसांत समन्वय साधून ७ मार्च, २०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक १० मार्चपर्यंत घ्यावी," असं आवाहन या तीनही नेत्यांकडून करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, "लोकसभा निवडणूक २०२४ ची अधिसूचना कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक विजय निश्चित करण्यासाठी एकसंघपणे लढण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आगामी काळात आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने तसेच खंबीरपणे मनाने सर्व आव्हानांना सामोरे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमधील योग्य समन्वय हेच विजयाचे पहिले पाऊल आहे. याची नोंद घ्यावी. याक्षणी आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचा विजय हीच आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय तोच आपल्या पक्षाचा विजय ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे," अशा सूचना मविआ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

"आपला विजयरथच महाराष्ट्राला संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण करून देईल" 

"आगामी काळात लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजयरथच महाराष्ट्राला संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण करून देईल याबाबत आपल्या मनात शंका नसावी. निवडणुकीचे रणशिंग आता फुंकलं गेलं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संपूर्ण ताकदीने व मतभेद विसरून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हानिहाय संयुक्त बैठक तातडीने घेणे आवश्यक आहे. निवडणुकीचे मुख्य ध्येय "महाविकास आघाडीचा विजय" हे असल्यामुळे त्याच्याशी निगडीत आपल्या जिल्ह्यातील विविध घटक/गट किंवा स्थानिक मित्र पक्ष यांना देखील या बैठकीचे निमंत्रण द्यावं," असंही आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलं आहे.

 

टॅग्स :महाविकास आघाडीलोकसभालोकसभा निवडणूक २०२४