मुंबई - देशातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक आयोग नेमण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवेळी भाजपाशीसोशल मीडिया अकाऊंट शेअर केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर करण्यात आला आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रवक्ता शेफाली शरण यांनी ट्विट करुन, याप्रकरणी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या एका ट्विटवरील प्रश्नावर उत्तर देताना, ही माहिती दिली. साकेत गोखले यांनीच निवडणूक आयोगावर हे आरोप लावले आहेत.
साकेत गोखले यांनी ट्विट करुन राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. सन 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला चालविण्यासाठी निवडणूक आयोगाने ज्या संस्थेला काम दिले होते, त्या संस्थेला भाजपानेच कामावर ठेवले होते, भाजपा नेत्यांकडेही हीच संस्था असल्याचा आरोप गोखले यांनी केला आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या, सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये 202 प्रेसमेन हाऊस, विलेपार्ले मुंबई. असा पत्ता देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नातेवाईकांच्या साईनपोस्ट इंडिया या कंपनीचाही तोच पत्ता होता, असा दावा गोखले यांनी केला आहे. तर, 202 प्रेसमेन हाऊस या पत्त्याचा वापर सोशल सेंट्रल नामक एक डिजिटल एजन्सीद्वारेही करण्यात आला होता. ही एजन्सी देवांग दवे नावाच्या मालकीची असून ते भाजपाच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय संयोजक आहेत. तसेच, भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी व सोशल मीडियाचे ते राष्ट्रीय संजोजक असल्याचा आरोप गोखले यांनी केला आहे.