पाच जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची नोटीस, कार्यशाळेची अनुपस्थिती भोवणार
By दीपक भातुसे | Published: June 28, 2023 10:11 AM2023-06-28T10:11:15+5:302023-06-28T10:14:04+5:30
MumbaI: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे.
- दीपक भातुसे
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित केलेल्या कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे स्पष्टीकरण मागवण्यात आल्याने या कार्यशाळेला गैरहजर असलेले पाच जिल्हाधिकारी अडचणीत आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जून रोजी पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उपस्थित राहणे बंधनकारक होते. जे अधिकारी काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नव्हते, त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची योग्य कारणासह पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती आणि मुंबई शहर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या कार्यशाळेला गैरहजर राहिले होते. त्यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण मागवले
आहे.
नोटीसमध्ये काय...
कोणतेही सबळ कारण न देता आपण गैरहजर राहिलात, हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.