नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधूनअजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट फुटून राज्यातील भाजप-शिवसेना आघाडी सरकारमध्ये सामील झाला. अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्हावर दावा सांगत तसा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यावर आयोगाने राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या गटाला नोटीस बजावली आहे.
राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवार यांनी आयोगाला सादर केले होते. मात्र, आता शरद पवार गटाला आयोगाने नोटीस बजावल्याने कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागणार आहे. या नोटिसीत आयोगाने नेमके काय म्हटले आहे, याचा तपशील समोर आलेला नाही. तसेच शरद पवार गट या नोटिसीला उत्तर देणार का, हेही स्पष्ट झालेले नाही.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा संघर्ष
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाहेर पडून भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केले. त्यावेळी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यात सुरू झालेला न्यायालयीन व निवडणूक आयोगासमोरील संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला आहे. त्या संघर्षाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यात होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.