राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 11:03 PM2024-02-22T23:03:37+5:302024-02-22T23:04:29+5:30

NCP Sharad Pawar Group News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले.

election commission of india gives man blowing turha tutari symbol to ncp sharadchandra pawar group after supreme court direction | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

NCP Sharad Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले. यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्ष चिन्ह द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांना एक पत्र देत याविषयी माहिती दिली. आयोगाने यापूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" असे नाव दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार त्यांच्या पक्ष/गटाला महाराष्ट्र राज्यातील सर्व संसदीय मतदारसंघासाठी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात येत आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!

"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!"

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालीच नसल्याचा दावा करत शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यास अजित पवार गटाने केलेल्या विरोधावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. तसेच तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहील, असे स्पष्ट करत, शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला चिन्ह दिले.

 

Web Title: election commission of india gives man blowing turha tutari symbol to ncp sharadchandra pawar group after supreme court direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.