मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे, राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक पक्षांचे दिग्गज नेते या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुन्हा एकदा भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, भाजपावर टीकास्त्र करताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. दरम्यान, सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा, असे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
भाजपने ५ वर्षे राजकारण केले, भारत भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो, असा सांगावा फडणवीस आज करत आहेत. मात्र, मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी परतावा अद्याप दिला नाही, मग इतर मागण्यांचे काय? असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.
भाजप प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत भालकेंबद्दल आदर आहे. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?. भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?, असा सवालही पाटील यांनी विचारला. फडणवीस यांनी हे सरकार कधी पाडायचं ते माझ्यावर सोडा, असं म्हटलं होतं. त्यावरुन, जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते फडणवीस
एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता ते बोलत होते.