मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून विकेट कोणाची जाणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढविले जात होते. आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी क्रॉसव्होटिंग होण्याची आणि धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे.
विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान शुक्रवारी विधानभवनात होईल व सायंकाळनंतर निकाल येण्याची शक्यता आहे.
हे आहेत रिंगणात
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील
मतांची समीकरणे कशी?
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात.
शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.
अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे.
उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत.
काँग्रेसची मते निर्णायक
काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.
काँग्रेसचे ४ जण क्रॉस व्होटिंग करतील
काँग्रेसमधील तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील, असे भाकीत एक उमेदवार व शेकाप नेते जयंत पाटील यांनी वर्तविले. हे आमदार कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत, मनाने काँग्रेससोबत नाहीत, असेही पाटील म्हणाले.
महायुतीला पराभव दिसत असल्याने ते काँग्रेसची मते फुटणार, अशी अफवा पसरवत आहेत. तसे अजिबात होणार नाही - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते