Join us

निमित्त: मुंबई बाजार समितीला पुन्हा सुगीचे दिवस ?

By नामदेव मोरे | Updated: March 10, 2025 10:58 IST

सर्वपक्षीय संचालकांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीसाठी ऐक्य दाखविले.

नामदेव मोरे 

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सर्वपक्षीय संचालकांनी मतभेद बाजूला ठेवून निवडणुकीसाठी ऐक्य दाखविले. मागील काही वर्षामध्ये आरोप प्रत्यारोपांमुळे बाजार समितीची प्रतिमा मलीन झाली आहे. थेट पणनसह नियमनमुक्तीमुळे व्यापार व उत्पन्नावर परिणाम झाला असून, नवीन सभापतींसह सर्व संचालकांसमोर संस्थेला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान आहे.

राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६२५ उपबाजारांची शिखर संस्था अशी मुंबई बाजार समितीची ओळख आहे. बाजार समितीच्या सभापतीपदावर शिंदेसेनेचे प्रभू पाटील व उपसभापतीपदावर काँग्रेसचे हुकूमचंद आमधरे यांची निवड झाली. संचालक मंडळाची मुदत सहा महिने उरली असताना ही निवड झाली असून, एवढ्या कमी कालावधीत विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे कसब नवीन सभापतींना दाखवावे लागणार आहे. बाजार समितीमुळे एक लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. वर्षाला दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमध्ये होते. परंतु, गेल्या काही वर्षापासून येथील व्यापाराला घरघर लागली आहे. शासनाने नियमनमुक्तीचा निर्णय घेऊन डाळी, सुका मेवा, साखर, रवा, मैदा या प्रमुख वस्तूंवरील नियमन हटविले आहे. कांदा, भाजी व फळांचे नियमन मार्केट आवारापुरते मर्यादित केले आहे. थेट पणनमुळे बाजार समितीची कृषी व्यापारातील मक्तेदारी संपुष्टात आली आहे. येथील व्यापाराला घरघर लागली असून, व्यापार पुन्हा सुरळीत करण्याचे आव्हान संचालकांना पेलावे लागणार आहे. यासाठी नियमनातून गेलेल्या वस्तू नियमनात आणणे वा त्यांच्याकडून सेवाशुल्क आकारून उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

मसाला मार्केटमधील एफएसआय घोटाळा, फळ मार्केटमधील शौचालय घोटाळ्यांसह अनेक आरोप येथील संचालक, कर्मचारी, अधिकारी व व्यापाऱ्यांवरही झाले आहेत. या आरोपांमुळे बाजार समितीची प्रतिमा मलीन झाली आहे. घोटाळ्यांची बाजार समिती अशी हेटाळणीही अनेकदा होत असते. कोणीही यावे, बाजार समितीवर आरोप करून मोकळे व्हावे, अशी स्थिती आहे. ज्यांनी एफएसआय घोटाळ्याचा आरोप केला तेच प्रभू पाटील आता सभापती झाले आहेत. यामुळे संस्थेची प्रतिमा सुधारण्यासाठी काम करण्याची कसरत त्यांना करावी लागेल. बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर येथील कामकाजासाठी जवळपास ८२८ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली होती. निवृत्तीमुळे ही संख्या ३४५ वर आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत असून, नवीन कर्मचारी नियुक्तीचे आव्हानही नवीन संचालकांसमोर उभे आहे. बाजार समितीने फळमार्केटमध्ये सात मजली इमारत बांधली असून, भाजी मार्केटजवळ निर्यात भवनची उभारणी केली आहे. धान्य मार्केटसमोर शीतगृह बांधले असून, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारती धूळखात असून, त्यांचा वापर करून उत्पन्नात भर टाकण्याचे कसब सभापतींना दाखवावे लागणार आहे. 

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईनवी मुंबई