आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक उद्या मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:44 IST2019-04-07T16:40:39+5:302019-04-07T16:44:35+5:30
लोकसभा निवडणुकीअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ५ केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक उद्या मुंबईत
मुंबई - लोकसभा निवडणुकीअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ५ केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले आहेत. दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक सोमवार (८ एप्रिल) मतदार संघात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून अभिषेक शर्मा व संतोष कुमार करनानी हे यापूर्वीच आले आहेत. तर सोमवारी ३१ -मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसामान्य केंद्रीय निरीक्षक म्हणून शिल्पा गुप्ता व ३० -मुंबई दक्षिण मध्य आणि ३१-मुंबई दक्षिण लोकसभा या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी असलेले भारतीय पोलीस सेवेतील दीपक पुरोहित हे येणार आहेत.
३१ -मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शिल्पा गुप्ता या मध्यप्रदेश कॅडरच्या २००८ च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी निरीक्षक आहेत. भारतीय पोलीस सेवेतील दीपक पुरोहित हे २००७ चे राजस्थानमध्ये आय.पी.एस. अधिकारी असून त्यांच्याकडे ३० -मुंबई दक्षिण मध्य आणि ३१ -मुंबई दक्षिण लोकसभा या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी आहे. तसेच याआधी दाखल झालेले भारतीय महसूल सेवेच्या २००५ च्या राजस्थान कॅडरचे संतोषकुमार करनानी यांच्याकडे ३१ -मुंबई दक्षिणची जबाबदारी असून भारतीय रक्षा लेखा सेवेच्या २००४ च्या राजस्थान कॅडरचे अभिषेक शर्मा यांच्याकडे ३० -मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.