Join us  

इलेक्शन आठवणी! प्रचारफेरीत ट्रकवर उभे केले डमी आनंद परांजपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:49 AM

परांजपे यांना काही प्रतिष्ठित व्यक्तींना भेटायला जायचे होते. मग, त्यावर तोडगा निघाला की, साधारण त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका गोऱ्यापान शिवसैनिकाला रथावर भगवा फेटा घालून उभे करायचे ठरले.

निवडणुका म्हटले की उमेदवार, कार्यकर्ते यांची प्रचंड लगबग असते. दैनंदिन राजकारण, कुरघोड्या यापेक्षाही निवडणुकीतल्या उलाढाली खूप महत्त्वाच्या नि मजेशीर असतात. २००८ मध्ये शिवसेना-भाजपाचे उमेदवार माजी खा. आनंद परांजपे होते. तेव्हा, ते शिवसेनेतच होते. भगवा फेटा बांधून त्यांची प्रचारयात्रा सर्वत्र सुरू होती. एका दिवशी झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या ट्रकवरून ते नेरळ-वांगणी अशी प्रचारफेरी करत असताना रात्रीचे ९ वाजले. प्रचारयात्रेची सांगता वांगणीला व्हायची होती, पण काही अंतर बाकी होते.

परांजपे यांना काही प्रतिष्ठित व्यक्तींना भेटायला जायचे होते. मग, त्यावर तोडगा निघाला की, साधारण त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका गोऱ्यापान शिवसैनिकाला रथावर भगवा फेटा घालून उभे करायचे ठरले. तो कल्याण पश्चिममधील कार्यकर्ता होता. प्रचारयात्रेच्या त्या धामधुमीत तो देखील लगेच तयार झाला. प्रचारयात्रा तशीच सुरू होती. त्या डमी परांजपे यांनी नागरिकांना हात उंचावून नमस्कार केले. त्या कार्यकर्त्याला दोन हात जोडून चेहºयासमोर ठेवण्यास सांगितले होते. काही काळानंतर प्रचारफेरी पूर्ण होत असतानाच पुन्हा खरेखुरे परांजपे आले आणि त्यांच्या उपस्थितीत त्या फेरीची सांगता झाली. त्यावेळी परांजपे हे नवीन असल्याने ते कोणालाच फारसे माहीत नव्हते, म्हणून ही आयडिया फलद्रुप झाली.

१९७० पासूनच्या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करण्याचा मला अनुभव आहे. पूर्वी निवडणुका जाहीर झाल्या की, उमेदवारांच्या नावांच्या घोषणा व्हायच्याआधीच आम्ही कार्यकर्ते रात्री बाहेर पडायचो आणि मोक्याच्या भिंतींवर सफेद रंग मारून त्यावर ‘मी शिवसेना कार्यकर्ता’ असे लिहून भिंती बुक करायचो. मग, कालांतराने उमेदवाराचे नाव रंगवायचो. ज्या पक्षाचे नाव भिंतीवर टाकले जायचे, त्यावर इतर कुठल्याच पक्षाचे कार्यकर्ते अतिक्रमण करत नसत. (खासदार जनसंपर्क कार्यालयाचे माजी प्रमुख)

(शब्दांकन : अनिकेत घमंडी) 

टॅग्स :मुंबईशिवसेनानिवडणूक