राज्यातील ९ मनपांची निवडणूक ऑक्टोबरपूर्वी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:16 AM2022-07-26T05:16:33+5:302022-07-26T05:17:36+5:30
अंतिम मतदार याद्याच २ सप्टेंबर रोजी जाहीर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहेत. याचा अर्थ ऑक्टोबरपूर्वी या महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्ट रोजी प्रारुपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जातील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे अशी कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.