Join us

तृतीयपंथी विद्यार्थ्याची निवड अध्यक्षपदी, ‘टिस’मधील विद्यार्थी निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 7:17 AM

कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकीत तृतीयपंथीय विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. 

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (टिस) विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी तृतीयपंथी विद्यार्थ्याची निवड झाली आहे. प्रतीक परमेय असे त्याचे नाव असून, तो मूळचा ईशान्य भारतातील आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकीत तृतीयपंथीय विद्यार्थ्याची अध्यक्षपदी निवड होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. 

‘टिस’ या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकीची निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाला. त्यात आंबेडकर स्टुडण्ट असोसिएशनने (एएसए) बाजी मारली. देशाच्या विविध भागांतून विविध संवर्ग, प्रवर्गातील हुशार, संशोधक विद्यार्थी ‘टिस’मध्ये शिक्षणासाठी येत असतात.

दरम्यान, पदव्युत्तरचे अनेक विद्यार्थी आपल्या द्वितीय वर्षाच्या प्रकल्पांसाठी इंटर्नशिप आणि फिल्डवर्कसाठी देशाच्या विविध भागांत असताना ‘टिस’मध्ये विद्यार्थी संघ निवडणूक पार पडली तरीही त्यात एएसए पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत ११ पदांसाठी २५ हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यात सात जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

उपेक्षित, वंचित, अत्याचारित घटकांचा आवाज म्हणून आम्ही भविष्यात त्यांच्यासाठी काम करणार आहोत. आतापर्यंत शिक्षणासारख्या मूलभूत घटकापासून वंचित असणाऱ्यांना आम्ही याच क्षेत्रातून पुढे येण्याची संधी प्राप्त करून देणार आहोत. - प्रतीक परमेय, अध्यक्ष, टिस विद्यार्थी संघ

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्यातरी शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकांमध्ये एक तृतीयपंथी विद्यार्थी अध्यक्षपदी निवडून आल्याची घटना घडली असून, भविष्यातील वंचित घटकांसाठी प्रेरणादायी, त्यांना मुख्य प्रवाहात आणणारा हा प्रसंग आहे. - दिगंबर बागूल, आंबेडकर स्टुडण्ट्स असोसिएशन.

टॅग्स :मुंबई