डॉ. नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीसाठी शिंदेसेना आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 08:27 AM2024-07-09T08:27:23+5:302024-07-09T08:27:34+5:30
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांचा प्रवेश सभापतीपद मिळेल याच अटीवर झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता असून या निवडणुकीत भाजपचा उमेदवार असेल अशी चर्चा सुरू आहे. मात्र, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतीपद देण्याचा शब्द दिल्याचे शिंदे सेनेतील एका वरिष्ठ नेत्याने 'लोकमत'ला सांगितले.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांचा प्रवेश सभापतीपद मिळेल याच अटीवर झाल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शब्द दिल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे.
विधानपरिषदेत भाजपचे सर्वाधिक १९ आमदार असून शिंदे सेनेचे केवळ ३ आमदार आहेत. विधानपरिषदेतील हे संख्याबळ पाहता सभापतीपद भाजपलाच मिळावे, असा दबाव भाजपच्या नेत्यांनी टाकला आहे. भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते नीलम गोऱ्हे यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून देत आहेत. त्यामुळे विधानपरिषद सभापतीपद कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे.