मुंबई : ‘इंटक’ संलग्न कामगार संघटना ‘श्रमिक उत्कर्ष सभा’च्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभा आणि कामगार मेळाव्यादरम्यान करण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे या मेळाव्याचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, आज कामगार वर्ग हवालदिल आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार, अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशावेळी श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांची तड लावण्याचे आवाहन मला करण्यात आले. त्याला प्रतिसाद म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मी ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांचा खूप आभारी आहे. त्यांनी गेली तीन दशके जो वसा चालवला आहे तो पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. केंद्रातील आमच्या सरकारच्या माध्यमातून अनेकानेक योजना कामगारांसाठी आणणे आणि इथल्या ठाकरे सरकारशी भांडून कामगारांचे हक्क त्यांना मिळवून देणे यासाठी मी कटिबद्ध आहे.
विजय कांबळे म्हणाले, कामगारांना प्रसाद लाड यांच्यासारखा हरहुन्नरी, धडाकेबाज आणि आक्रमक नेता मिळणे ही काळाची गरज आहे. केंद्रातील पक्षाची सत्ता आणि राज्यातील सरकारशी लढण्याची तयारी यामुळे या संघटनेच्या माध्यमातून लाड कामगारांसाठी भरीव काम करतील, याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.