इलेक्शन आठवणी; आताच्या बिर्याणीपेक्षा तेव्हाच्या कुरमुरा भेळीची ती चव न्यारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 02:36 AM2019-04-03T02:36:51+5:302019-04-03T02:37:25+5:30
पूर्वीच्या काळी कुठलीही निवडणुक असली की प्रचाराची एक विशिष्ट पध्दत होती
मंदार हळबे
पूर्वीच्या काळी कुठलीही निवडणुक असली की प्रचाराची एक विशिष्ट पध्दत होती. सर्वच कार्यकर्ते हे स्वत:ची नोकरी, व्यवसाय, शाळा, कॉलेज सांभाळून संध्याकाळी प्रचारानिमित्त एकत्र जमायचे. त्यात विविध वयोगटाचा विचार करून कार्यकर्त्यांना वेगवेगळया कामांची जबाबदारी दिली जायची. मुली, महिला किंवा शालेय विद्यार्थी यांना घरबसल्या मतदान स्लीप लिहिण्याचे काम दिले जायचे व स्लीप वाटण्याचे काम शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले जायचे. स्लीप स्वत: हाताने लिहिलेली असल्याने बहुतांश मतदार हे कार्यकर्त्यांना मुखोदगत असायचे. मतदान यादीत पत्ता चुकला असला तरी कार्यकर्ते ती व्यक्ती कुठे राहते हे अचूक सांगायचे.
तळमजल्यावर राहणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याचे घर किंवा गॅलरी निवडणूक काळात त्या विभागातील प्रचार साहित्याचे गोडाऊन असायचे. संध्याकाळी सहानंतर कॉलेजवयीन आणि नोकरदार कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला सुरूवात करीत व रात्री उशीरापर्यंत पोस्टर चिकटवणे, फलक रंगवणे, कापडी बॅनर रंगवणे, लावणे अशी विविध कामे करीत. प्रचाराच्या काळात कार्यकर्त्यांना त्यांच्या मधील कोणाच्या ना कोणाच्या घरून कधी चहा-बिस्कीट तर कधी कॉफी, घरी केलेली भजी, कांदापोहे, उपमा असा खाऊ मिळायचा. मतदानाच्या दिवशी बुथ व रस्त्यावर लावलेल्या स्टॉलवर बसलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते आणि हितचिंतकाच्या घरून पोळी-भाजी आणून दिली जायची. पूर्ण निवडणूक व प्रचाराच्या काळात तसेच मतदानाच्या दिवशी कार्यकर्ते कुठलीही आर्थिक अपेक्षा ठेवत नव्हते. कार्यकर्त्यांच्या खानपानाचा खर्च उमेदवारावर क्वचितच पडत असे. प्रचार सुरू असताना उमेदवार तसेच वरीष्ठ पदाधिकारी यांची भोजनाची प्रसंगी राहण्याची व्यवस्थाही विविध कार्यकर्त्यांची घरी केली जात असे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये त्यावेळेस एक कौटुंबिक नाते निर्माण झाल्याचे पहावयास मिळायचे. मतदान संपल्यानंतर विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ता किंवा पदाधिकाºयाच्या घरी सर्व कार्यकर्ते जमत असत व खाऊ म्हणून कुरमुºयाची भेळ दिली जात असे. त्यात शेव नावालाच असायची पण त्या भेळेला आताच्या कुठल्याही बिर्याणीची चव येऊ शकत नाही. कारण भेळ खाण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर उमेदवार तथा नेतेमंडळीही मांडीला मांडी लावून बसत असत. आता निवडून येण्याची क्षमता व ज्याकडे पैसा आहे त्याला उमेदवारी देण्याचा चंग सर्वच पक्षांकडून मांडला जात असल्याने निस्पृह भावनेने काम करणारा कार्यकर्ता संपत आहे.
शब्दांकन : प्रशांत माने