शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांत गेले काही दिवस धनुष्यबाणावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर ठाकरेंच्या पक्षाला 'मशाल', तर शिंदे यांच्या पक्षाला 'ढाल दोन तलवारी' या नव्या निशाणी निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या निशाणी तात्पुरत्या असून, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर आम्ही 'धनुष्यबाण' या शिवसेनेच्या मूळ चिन्हाकरिता दावा करू, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आता ठाकरे- शिंदे यांना नव्या चिन्हांसोबत राजकीय वाटचाल करावी लागेल. महापालिका अथवा आगामी विधानसभा निवडणुकीत यदाकदाचित धनुष्यबाण मिळवण्याकरिता ठाकरे-शिंदे यांनी धडपड केली, तर पुन्हा आपले चिन्ह लोकांपर्यंत नेण्याची धडपड पक्षाला करावी लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
मशाल व ढाल तलवार ही दोन्ही चिन्हे शिवसेनेच्या राजकीय प्रवासात यापूर्वी वापरली गेली होती. कालौघात त्याचा विसर पडून धनुष्यबाण हेच चिन्ह ही शिवसेनेची ओळख झाली होती. सोशल मीडियाच्या मदतीने आता मशाल व ढाल-तलवार ही चिन्हे लोकांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे वरचेवर चिन्हं बदलणे हे पक्षाच्या हिताचे ठरणार नाही, असे निवडणूक आयोगातील जाणकारांचे म्हणणे आहे.
ठाकरे व शिंदे यांच्या पक्षाची नावे व चिन्हे नवी असल्याने सुरुवातीच्या एक दोन निवडणुकीत ती लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता पक्षाला धडपड करावी लागेल. कालांतराने एकदा चिन्ह मतदारांच्या मनावर बिंबल्यावर पक्षाचा नेता हीच पक्षाची ओळख असते. मला निवडणुकीत अमुकतमुक चिन्हाला मत द्यायचे आहे, असे म्हणण्यापेक्षा मला बाळासाहेब ठाकरे अथवा शरद पवार यांच्या पक्षाला मत द्यायचे आहे, असे मतदार सांगतो. भारतीय लोकशाहीत नेत्याचा करिष्मा हाच पक्षाला तारणारा ठरत असतो. त्यामुळे चिन्हे दुय्यम असतात. हीच गोष्ट उमेदवारांच्या बाबत आहे.
उमेदवार पाहून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान होते. त्यामुळे नामसाधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरवून अधिकृत उमेदवाराची मते खाण्याची खेळी विरोधक करतात. मात्र, अशावेळी चिन्हाचे महत्त्व वाढते. एकाचवेळी रिंगणात दोन किंवा तीन शरद पवार नावाची माणसे उभी केल्यावर मग घड्याळ चिन्ह असलेल्या शरद पवार यांना मत द्या, असा प्रचार करावा लागतो, असे निवडणूक विषय जाणकारांचे मत आहे.
गमतीदार चिन्हे हद्दपारयापूर्वी झगा, फुगा, खाट, गाजर अशी काही गमतीदार चिन्हे उमेदवारांना दिली जायची. त्यावरून अमुकतमुक उमेदवार मतदारांना गाजर दाखवतोय किंवा अमुकतमुक उमेदवाराचा फुगा फुटणार, अशी टीकाटिप्पणी करण्याची संधी विरोधकांना आयती चालून येत होती. आयोगाने अशी गमतीदार चिन्हे काढून टाकल्याने उमेदवारांची सुटका झाली.
धार्मिक चिन्हांवरून घोळ कायमधार्मिक चिन्हांबाबत खुद्द निवडणूक आयोग संभ्रमात आहे. उगवता व तळपता सूर्य आयोगाला चालतो; परंतु चंद्र चालत नाही. शंकराचा त्रिशूळ व हनुमानाची गदा हे धार्मिक चिन्ह आहेत. रामाचे धनुष्यबाण आतापर्यंत चालत होते. देशात राममंदिराच्या नावाने भाजपने आंदोलन सुरु केले, तेव्हा धार्मिक चिन्हे काढून टाकण्यात आली होती.