ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ६ - ठाणे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रविंद्र फाटक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. १९९२ पासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. रविंद्र फाटक १५३ मतांनी विजयी झाले. त्यांना ६०२ मते मिळाली. डावखरेंना ४४९ मते मिळाली. पराभव स्पष्ट होताच डावखरेंनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.
अखेरच्या क्षणी शिवसेनेने रविंद्र फाटक यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत आणली. यापूर्वी दोनवेळा आमदारकीच्या निवडणुकीत रविंद्र फाटक यांचा पराभव झाला होता. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही मोठी ताकद आहे. त्यांनी डावखरेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते.
या निवडणुकीत अपक्षांची ७२ मते निर्णायक होती. त्याचा फाटक यांना फायदा झाल्याचे दिसत आहे. रविंद्र फाटक हे काहीवर्षांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. २०१४ मध्ये त्यांनी राणेंची साथ सोडून ते शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.
२००९ मध्ये भाजपच्या प्रमोद जठार यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवताना त्यांना भाजपच्या संजय केळकर यांनी पराभूत केले होते. यापूर्वी विधानपरिषदेवर निवडून जाताना डावखरेंना शिवसेनेबरोबर असलेल्या जवळीकीचा फायदा झाला होता.