मुंबई - राज्यातील मुंबई महापालिका वगळता सर्व महापालिका व नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे पालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने पुढील 2 आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करत मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 236 पर्यंतच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार हे आता मुंबईकरांना माहिती होणार आहे. त्यानुसार निवडणुकीच्या कामाला गती येणार असून विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवतील.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार, प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू असल्याने प्रभार रचनेला वेळ लागणार आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. महापालिका निवडणुका सप्टेंबर महिन्यात घ्याव्यात. तर जिल्हा परिषदा निवडणूका आक्टोबर महिन्यात घेण्यासंदर्भात, विनंती या अर्जात करण्यात आली आहे. त्यामुळे, आता निवडणुका ह्या तीन महिन्यांनीच होण्याची शक्यता दिसून येत आहे.