मुंबई : कोविडकाळात लांबणीवर पडलेल्या रस्त्यांच्या कामाची महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घाई सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात भाजपचा विरोध डावलून रस्त्यांचे एक हजार ८१५ कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यानंतर आता आणखी ४४३ कोटी १६ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आले आहेत. यामध्ये गोरेगाव पूर्व, आरे कॉलनीतील रस्त्यांसह १४३ छोट्या-मोठ्या रस्त्यांच्या दुरुस्ती, काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे.
मुंबईतील सहा मीटरपेक्षा छोटे व काही मोठ्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे, तर आरे कॉलनीतील प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिका ३१३ कोटी ८४ लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १८० कोटी ३९ लाख रुपये, दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९४ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
आरे कॉलनीतील रस्ते दुरुस्ती गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील पश्चिम द्रुतगती मार्गापासून पवई येथील मोरारजी नगरपर्यंतचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ३८ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ९.८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून, त्याच्या प्रत्येक किलोमीटरच्या काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी ९२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
पदपथांची दुरुस्तीकुलाबा, फोर्ट, ग्रँटरोड, भायखळा या तीन विभागातील १९ पदपथांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. १८ कोटी ६७ लाख रुपये खर्च करून या सर्व पदपथांची दुरुस्ती केली जाणार आहे.
कमी दराने निविदाएप्रिल महिन्यात रस्ते दुरुस्तीसाठी मागवलेल्या निविदांमध्ये ठेकेदारांनी ३० टक्क्यांहून कमी खर्चात काम करण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून पालिकेने फेरनिविदा मागवल्या. मात्र पुन्हा १३ ते २० टक्के कमी दर ठेकेदारांनी लावले आहेत.
रस्ते दुरुस्ती रखडण्याची शक्यतारस्ते दुरुस्तीआधी भूमिगत जलवाहिन्या बदलण्याची कामे केली जातात. मुंबईतील जीर्ण जलवाहिन्या बदलण्याच्या कामांना दोन महिन्यांपूर्वी १५ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. मात्र, अद्याप कामे सुरू झाली नाही. हे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक विभागांतील रस्ते दुरुस्तीला फटका बसण्याची शक्यता आहे.