पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, भ्रष्टाचाराला बळी पडू नका! ‘स्टिंग आॅपरेशन’ होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:38 AM2018-04-03T05:38:37+5:302018-04-03T05:38:37+5:30
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून राजकीय पक्षाकडून भ्रष्टाचाराबाबत लाइव्ह स्टिंग आॅपरेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही आमिष, भ्रष्टाचाराला बळी न पडता कर्तव्य बजावा, अशी अजब सूचना मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांना केली आहे.
- जमीर काझी
मुंबई - पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात ठेवून राजकीय पक्षाकडून भ्रष्टाचाराबाबत लाइव्ह स्टिंग आॅपरेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही आमिष, भ्रष्टाचाराला बळी न पडता कर्तव्य बजावा, अशी अजब सूचना मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांना केली आहे.
या आदेशाची प्रत ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाली आहे. वास्तविक, पोलिसांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहारापासून नेहमीच दूर राहण्याची आवश्यकता असताना, निवडणुकीचा संदर्भ देऊन काढलेल्या या गोपनीय पत्राबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई वाहतूक शाखेतील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचाराबाबत दीड वर्षापूर्वी उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने कोर्टाकडून चपराक मिळाली आहे. त्यांच्या निर्देशानुसार ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे मुख्यालय व पूर्व उपनगर विभागाचे उपायुक्त त्रिपाठी यांनी २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीचा संदर्भ देऊन बजावलेले आदेश चर्चेचा विषय बनला आहे.
भाजपाशी संबंधित युवा एकता फाउंडेशनच्या आशिष वर्मा व बॉबी कटारिया यांनी वाहतूक शाखेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत एक निवेदन दिले होते. त्यानुषंगाने उपायुक्त त्रिपाठी यांनी २८ मार्चला कार्यक्षेत्रातील सर्व सहायक आयुक्तांना बजावलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, आप पक्षाकडून ट्रॅफिकमधील भ्रष्टाचाराबाबत ‘लाइव्ह स्टिंग आॅपरेशन’ करण्यात येत आहे. पुढील वर्षी होणाºया निवडणुकांवर लक्ष ठेवून विरोधकांकडून हे कृत्य केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकाºयांनी भ्रष्टाचाराला बळी न पडता, कर्तव्य योग्यपणे पार पाडावे. त्याचप्रमाणे, सर्व अधिकारी व अंमलदारांना त्याची सूचना देऊन खबरदारी घ्यावी. या आदेशाच्या सोबत युवा एकता फाउंडेशनने दिलेल्या पत्राची प्रत संदर्भासाठी दिली आहे.
कामाच्या अनुषंगाने वेळोवेळी अधिकाºयांना लेखी सूचना दिल्या जातात. २०१९च्या निवडणुकीच्या संदर्भाने बजावलेले पत्र ही गोपनीय बाब आहे. त्यामुळे त्याबाबत मी काहीही भाष्य करू शकत नाही.
- डॉ. सौरभ त्रिपाठी, उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा