अरुणकुमार मेहत्रे। लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कपबशी हे चिन्ह आरक्षित ठेवण्याकरिता पत्र दिले होते. मात्र रासप आणि भारिपनेही या चिन्हाची मागणी करून लालबावट्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आधीच्या निवडणुकीत किमान पाच टक्के उमेदवार निवडून आले असतील तर संबंधित पक्षाकरिता हे चिन्ह राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार शेकापला मागील निवडणुकीत यश मिळालेले आहे. परंतु इतर दोन पक्ष त्यामध्ये बसत नसल्याने त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने नामंजूर केला. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप उमेदवाराला कपबशी चिन्ह मिळणार आहे.खटारा चिन्हानंतर शेतकरी कामगार पक्षाला कपबशीवर कमालीचे यश मिळत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि कोकण शिक्षक मतदार संघात शेकापने या चिन्हावर निवडणुका जिंकल्या. त्यामुळे पनवेल महानगरपालिका सुध्दा याच चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार काही महिन्यांपासून शेकापकडून या चिन्हाचे ब्रँडिंग सुरू आहे.निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर कपबशीचा प्रचार सुरू करण्यात आला होता. आजही अनेक ठिकाणी फक्त या निशाणीचा प्रचार आणि प्रसार करणारे फलक लावण्यात आले आहेत. असे असताना राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने कपबशी चिन्हाकरिता अर्ज केला. याशिवाय भारिप बहुजन महासंघाने सुध्दा हे चिन्ह आमच्या उमेदवारांकरिता राखीव ठेवण्याची मागणी करून शेकापला ऐन मोक्याच्या क्षणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. या दोनही पक्षाने दावा केल्याने हे चिन्ह मिळेल की नाही असा प्रश्न नेते आणि शेकापच्या उमेदवारांनाही पडला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोंदणीकृत राजकीय पक्षाने नजीकच्या निवडणुकीत एकूण जागेपैकी पाच टक्के जागेवर विजय मिळवला तर त्या पक्षाला आगामी निवडणुकीत मागणी केलेले चिन्ह आरक्षित ठेवता येण्याची तरतूद आहे.
निवडणुकीत कपबशी शेकापसाठीच राखीव
By admin | Published: May 11, 2017 1:48 AM