मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का, याबाबत उत्सुकता असेल. तसेच भाजपचीही कसोटी लागणार आहे. मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि नागपूर या सहा जागांसाठी ही निवडणूक होईल.
मुंबईत शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप, कोल्हापुरात काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील, धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल, अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये सेनेचे गोपीकिशन बाजोरिया, नागपुरात भाजपचे गिरीश व्यास यांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक होत आहे. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात.
सोलापूर, अहमदनगर मात्र नाही
सोलापूर मतदारसंघाचे आ. प्रशांत परिचारक (भाजप) व नगरचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अरुण जगताप (राष्ट्रवादी) यांचा काळ १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे; पण तेथे सध्या निवडणूक मात्र होणार नाही. कारण, नियमाप्रमाणे त्या-त्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान ७५ टक्के सदस्य मतदानासाठी उपलब्ध असावे लागतात. ते नसल्यामुळे या दोन ठिकाणची निवडणूक होणार नाही.
निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना निघणार - १६ नोव्हेंबरउमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - २३ नोव्हेंबरउमेदवारी अर्जांची छाननी - २४ नोव्हेंबरउमेदवारी अर्ज घेण्याची शेवटची तारीख - २६ नोव्हेंबरमतदानाची तारीख व वेळ - १० डिसेंबर सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत