मुंबई- राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणुकांच्या घोषणेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. त्यानुसार, आवश्यकता असल्यास १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.
नगरपंचायत अन् नगपरिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी मागणी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह अन्य राज्यातील पक्षांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळत निवडणुका वेळेत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सदर निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.