"निवडणुका कधीही लागतील, गाफील राहू नका"; ठाकरेंची BMC साठी रणनीती ठरली, बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:44 PM2024-12-03T15:44:49+5:302024-12-03T15:46:13+5:30
Uddhav Thackeray BMC Election: विधानसभा निवडणुकीत मोठा झटका बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
Uddhav Thackeray Shiv Sena UBT News: विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला जबर हादरा बसला. अवघ्या २० जागाच शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महापालिकांच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली असून, यात एक महत्त्वाची निवडणूक मुंबई महापालिकेची आहे. बीएमसी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केली असून, माजी नगरसेवकांना आणि नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर
'शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे. उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा', असे उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना म्हणाले.
'भाजपचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे', अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या आहेत.
'ईव्हीएमचा मुद्दा आम्ही बघू, तुम्ही लोकांमध्ये जा'
'आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू, तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा', असे उद्धव ठाकरे माजी नगरसेवक आणि नेत्यांना म्हणाले.