सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर एसबीआयने इलेक्टोरल बाँड बाबत माहिती जाहीर केली आहे. या बाँडमार्फत आलेल्या देणगीवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत भाजपवर आरोप केले आहेत. "जुगारात अनेक कुटूंब नष्ट झाली.पोलिस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्याने या जुगारास सरकारी पाठबळ आहे. कारवाईची मागणी केली. फडणवीस कारवाई करतील कशी? या जुगारी कंपनीने ४५० कोटी भाजपला देणगी दिली आहे. तर ही आहे भारतीय जुगारी पार्टी? , अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली. या टीकेला आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी ट्विट करुन खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटमध्ये प्रविण दरेकर म्हणाले की, फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ३७% म्हणजे ५०९ कोटी रुपये तुमच्या इंडी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकला दिलेत. हे स्वतः द्रमुकने सुद्धा जाहीर केले.
नाही कुणाचे तर किमान राजदीप सरदेसाई यांचे तर ट्विट एकदा वाचून घेतले असते. अर्थात दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट देणाऱ्यांना ते कसे दिसेल?, असा टोलाही प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
खासदार संजय राऊतांचेही ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज इलेक्टोरल बाँड्सवरुन ट्विट करुन भाजपवर आरोप केले. राऊत ट्विटमध्ये म्हणाले की, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळाची माहिती दिली. या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर अनेक तरुण मुले उध्वस्त होत असून या जुगारात अनेक कुटूंब नष्ट झाली.पोलिस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्याने या जुगारास सरकारी पाठबळ आहे.कारवाईची मागणी केली. फडणवीस कारवाई करतील कशी? या जुगारी कंपनीने (future gaming.. Martin lottery agency Ltd.) ४५० कोटी भाजपला देणगी दिली आहे. तर ही आहे भारतीय जुगारी पार्टी?, अशी टीका केली आहे.
फ्यूचर गेमिंगचा ८०% निधी ‘द्रमुक’ला
‘द्रमुक’ला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एकूण ६५६.५ कोटी रुपये मिळाले असून, त्यात फ्यूचर गेमिंगने दिलेल्या निधीचा वाटा ८० टक्के आहे. ‘फ्यूचर गेमिंग’ने जानेवारी २०२४ पर्यंत एकूण १ हजार ३६८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्टेट बँकेने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ३७ टक्के निधी ‘द्रमुक’च्या वाट्याला गेला आहे.