विद्युत रोषणाई झाडांच्या मुळावर, झगमगाट जैवसाखळीसाठी जीवघेणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 05:38 PM2024-02-26T17:38:17+5:302024-02-26T17:38:49+5:30
अनेक ठिकाणी तर झाडांना रंगरंगोटी ही करण्यात येत असून अशाप्रकारे खोडांना रंग चढविला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
महापालिकेचे सौंदर्यीकरण हे झाडांच्या मुळावर उठले आहे. सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून झाडांभोवती सर्रास गुंडाळण्यात येणाऱ्या विविध रंगांच्या एलईडी लाईट्स फक्त झाडांना हानीकारक ठरत असून संपूर्ण जैवसंस्थेला आणि त्यातील छोट्या छोट्या जीवांना हानीकारक ठरत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमी करत आहेत. अनेक ठिकाणी तर झाडांना रंगरंगोटी ही करण्यात येत असून अशाप्रकारे खोडांना रंग चढविला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून तज्ज्ञांचा सल्ला घेून ही कार्यवाही करण्यात येते का असा प्रश्न पालिकेला उपस्थित केला आहे.
पालिकेच्या सौंदर्यीकरणाचा भाग आणि जी २० परिषदेच्या निमित्ताने पालिकेकडून रस्त्यालगतच्या नाईक झाडांवर विद्युत ऱोषणाई करण्यात आली. याशिवाय सण-उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमाच्या कालावधीत परिसर आकर्षक दिसावा म्हणून रस्त्यालगतच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात येते.
पालिकेकडून दखल नाही
अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेकडून यापरवी झाडांवर होणाऱ्या प्रकास प्रदूषणासंबंधी पत्र पाठविण्यात आले होते. तसेच यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ही करण्यात आली होती. मात्र, या पत्रव्यवहाराला २ महिने उलटूनही पालिकेकडून याची दखल ही घेतली गेली नाही.
पक्ष्यांसाठी हे घातक
मात्र, विद्युत रोषणाईमुळे केवळ वृक्षांच्या वाढीवर परिणाम होत नाही तर त्यांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत म्हणजेच अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत ही अडथळा येतो. याशिवाय कीटक, पक्ष्यांसाठी हे घातक ठरतात. रात्रीच्या अंधारात अचानक प्रकाशझोत आल्यास वन्यप्राणी संभ्रमित होण्याचा धोका असतो, असे मत पर्यावरण संस्थामध्ये कार्यरत तज्ज्ञ व्यक्त करतात.
झाडावर होणारा एलईडी लाइट्सचा प्रयोग हा विष प्रयोगासारखाच असतो. त्यामुळे झाडाचे आयुर्मान कमी होते. आहेत ती वृक्षसंपदा जोपासता येत नसेल तर मग इतर ठिकाणी नवीन झाडे लावून उपयोग काय?
- तुषार वारंग, मुंबई जिल्हा समन्वयक, अंघोळीची गोळी
मुंबईत सुशोभीकर प्रकल्पात केला जाणारा झगमगाट, त्यामुळे होणारे प्रकाश प्रदूषण अनाकलनीय आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे मनमानी पद्धतीने निधीचा दुरुपयोग पालिकेकडून केला जात आहे.
- गॉडफ्रे पिमेंटो, विश्वस्त, वॉच डॉग फाऊंडेशन