मुंबई :
नव्या वर्षात ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांच्या वीजबिलाचे आकडे फुगण्याची दाट शक्यता आहे. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या दोन्ही कंपन्यांनी २०२३ २४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी वीज दरवाढीसाठीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) दाखल केली आहे. अदानी कंपनीने घरगुती ग्राहकांच्या वीजदरात सरासरी एक टक्क्याची वाढ प्रस्तावित केली आहे. तर टाटांनीही दरवाढ सुचवली आहे.
दोन्ही कंपन्यांच्या याचिकांवर पुढील महिन्यात ऑनलाइन सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी आयोगाकडून याचिकांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. सुनावणीनंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होऊन एप्रिलपासून वाढीव दरानुसार वीजबिल प्राप्त होणार आहे. दरम्यान, वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी आयोगाच्या ऑनलाइन सुनावणीवर आक्षेप घेतला आहे. ही सुनावणी ऑफलाइन व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे.
इलेक्ट्रिक कार वापरणाऱ्यांना दिलासा१. विजेवर धावणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटीने या दरात घट प्रस्तावित केल्याने इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.२. विजेवर धावणारी वाहने चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दराचा विचार करता कमी दाबाच्या वीज ग्राहकांसाठी २८ टक्क्यांची घट आहे.३. तर उच्च दाबाच्या वीज ग्राहकांसाठी ३५ टक्क्यांची घट आहे. औद्योगिक वीज दरात ४ टक्क्यांपासून ८ टक्क्यांपर्यंत घट होणार आहे.४. दरम्यान, दोन वर्षांत अपारंपरिक विजेवर भर देणार असल्याचे नमूद केल्याने विजेच्या दरात वाढ होणार नाही, असा दावाही अदानीने केला आहे.वीज दरवाढीचे गणितघरगुती ग्राहकांचे वीजबिल आता ५०० रुपये येत असेल तर नव्याने लागू होणाऱ्या वीज दरवाढीमुळे वीज बिलात ५० रुपयांची वाढ होईल. नव्याने येणारे वीजबिल ५५० रुपये किंवा वापरलेल्या युनिटप्रमाणे वाढीव येईल, अशी माहिती वीजतज्ज्ञांनी दिली.