उरण : तालुक्यातील वारंवार वीज प्रवाह खंडित होण्याच्या वाढत्या प्रकारामुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गुरुवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज मंडळाच्या कार्यालयाला घेराव घातला आणि निदर्शने करून संताप व्यक्त केला.उरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. वीज सातत्याने गायब होण्याच्या प्रकारामुळे १०-१२ दिवसांपूर्वीच उरण शहरातील संतप्त नागरिकांनी निदर्शने, घेराव घालीत उरण सबस्टेशनचीच नासधूस केली होती. पोलीस, तहसीलदार, वीज मंडळाचे अधिकारी आणि नागरिक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र परिस्थिती जैसे थे अशीच राहिली. मागील शनिवारपासून शहर आणि ग्रामीण भागातील बत्ती गुल झाल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी (२४) उरण वीज मंडळाच्या कार्यालयाकडे धाव घेवून अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. त्यानंतर उशिरा का होईना जाग आलेल्या शेकापने गुरुवारी (२५) माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शेकाप शिष्टमंडळाने वीज मंडळ अधिकाऱ्यांची भेट घेतली. उरण परिसरातील वीज गुल होण्याची समस्या येत्या १५ दिवसांत दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मोर्चेकरी माघारी वळले. (वार्ताहर)
उरणमध्ये विजेचा खेळखंडोबा
By admin | Published: June 25, 2015 11:05 PM