मध्य रेल्वेवर ९५ वर्षे धावतेय इलेक्ट्रिक लोकल; हिरवा झेंडा दाखवून आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:59 AM2020-02-04T03:59:33+5:302020-02-04T06:12:43+5:30
‘ईएमयू’चा ३ फेब्रुवारी १९२५ रोजी शुभारंभ
मुंबई : मध्य रेल्वेत ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) सेवा ३ फेब्रुवारी १९२५ रोजी सुरू करण्यात आली. मुंबईचे तत्कालीन राज्यपाल सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते ४ कारसह प्रथम ईएमयू सेवेचा शुभारंभ झाला होता. पहिली सेवा तत्कालीन बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) ते हार्बर मार्गावरील कुर्ल्यापर्यंत होती. आज मध्य रेल्वे मार्गावरील या इलेक्ट्रिक लोकल सेवेला ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर ईएमयू सेवेला ९५ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विभागातील निवृत्त कर्मचारी वीणाधरन पी.टी. यांनी यानिमित्त केक कापून, लोकलला हिरवा झेंडा दाखवून आठवणींना उजाळा दिला.
यावेळी ईमयू पत्रकही प्रकाशित ेकेले. या सोहळ्यास अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि प्रधान मुख्य विद्युत अभियंता एस.पी. वावरे, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए.के. गुप्ता, मुख्य विद्युत लोकोमोटिव्ह अभियंता अनुप अग्रवाल उपस्थित होते.
वर्षानुसार ‘ईएमयू’ आणि तिचे बदलत गेलेले प्रकार
- १९२५ हार्बर मार्गावर ४ कोच (डबे)
- १९२७ मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावरील ८ कोच
- १९६१ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ९ कोच
- १९८६ मध्य रेल्वे मार्गावर १२ कोच
- १९८७ कर्जतच्या दिशेने १२ कोच
- २००८ कसाऱ्याच्या दिशेने १२ कोच
- २०१० ट्रान्स हार्बर लाइनवर १२ कोच
- २०१२ मुख्य मार्गावरील १५ कोच
- २०१६ हार्बर मार्गावर १२ कोच
- २०२० ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल