मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून इंधनावर धावणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांची रस्त्यावर गर्दी होत आहे. याच वाहनांना चार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी पॉइंट मिळावेत म्हणून टाटा, अदानीसारख्या वीज कंपन्या चार्जिंग पॉइंट उभे करत असून, टाटाच्या इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसने तर हजाराचा टप्पा गाठला आहे. महापालिकादेखील प्रदूषण कमी करण्यासाठी चार्जिंग पॉइंटस बसविण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईत इलेक्ट्रिक गाड्या सुसाट धावल्याचे पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सगळे चार्जिंग पॉइंटस हरित ऊर्जेवर चालणारे आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात आजघडीला १० हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. या वाढत्या वाहनांना चार्जिंग करणे सोयीचे व्हावे म्हणून २०२१ पासून टाटा पॉवरने चार्जिंग स्टेशन बसविण्यास सुरुवात केली असून, आता हा आकडा १ हजारांवर पोहोचला आहे. त्यानुसार, ४४ सार्वजनिक, ३८५ निवासी सोसायट्यांमध्ये ५८ मॉल्स आणि हॉटेल्स, कामाच्या जागी बसविण्यात आले आहेत.
५३१ फ्लीट चार्जिंग पाइंटस असून, याद्वारे ओला, उबरसारखी वाहने चार्ज केली जातात. आता राज्यभरात टप्प्याटप्प्याने ४ हजारांहून अधिक चार्जिंग पॉइंट्स बसविले जाणार असून, चार्जिंग पॉइंट्स हरित ऊर्जेवर (ग्रीन एनर्जी) चालविले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार, २०३० पासून देशात विक्री केली जाणारी प्रत्येक मोटारकार इलेक्ट्रिक असेल. विद्युत वाहने विक्रीचा हिस्सा ३० टक्के खासगी कारसाठी, ७० टक्के व्यावसायिक वाहनांसाठी आणि ८० टक्के दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी असावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
तीन-साडे तीन तासांत एक वाहन चार्ज -
१) फास्ट चार्जिंग पॉइंटद्वारे तीन ते साडे तीन तासांत एक वाहन चार्ज होते.
२) सर्वसाधारण चार्जिंग पॉइंटद्वारे एक वाहन चार्ज करण्यास सहा ते तास तास लागतात.
३) मुंबई - पुणे महामार्गावर १९ पेक्षा जास्त फास्ट चार्जिंग पांइटस बसविण्यात आले आहेत.
४) मुंबई - गोवा महामार्गावर २६ फास्ट चार्जिंग पॉइंटस बसविण्यात आले आहेत.
महावितरणचा पुढाकार - राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात १ जून २०२३ पर्यंत एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली. पॉवरअप ईव्ही या ॲप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात.
१२०० खासगी चार्जिंग पॉइंट्स -
१) २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अदानी इलेक्ट्रिसिटीने १३५ ईव्ही चार्जिंग स्टेशन हाऊसिंग सोसायटीमध्ये लोकांकरिता बसविले. १२०० खासगी चार्जिंग पॉइंट्स ग्राहकांकरिता बसवले.
२) मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी चार्जिंग करण्याची सुविधा उभारणीला बळकटी दिली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये देखील इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जात आहे.